परभणी : पर्यावरणाचे संवर्धन करणे ही काळाची गरज झाली आहे.
पावसामुळे मातीची झीज थांबविण्यासाठी बांबूची लागवड खूप फायदेशीर असून जिल्ह्यातील गोदाकाठच्या व नदी, नाले, ओढ्याच्या दोन्ही बाजूस बांबू लागवड केल्यास पर्यावरणाचा ऱ्हास रोखता येईल.
जिल्ह्यात पर्यावरण संतुलनासह मानव जातीच्या कल्याणासाठी बांबू लागवड योजना यशस्वी करण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे, असे आवाहन राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी केले.
बांबू लागवडीसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी दी.म.मुगळीकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती मंजूषा मुथा आदि प्रमुख उपस्थित होते.
सुरुवातीला जिल्हाधिकारी दी.म.मुगळीकर यांनी प्रास्ताविक केले. बांबू लागवडीचा कार्यक्रम हाती घेवून शेतकऱ्यांनी बांधावर बांबू लागवड करणे सोईचे होईल.
बांबूची रोपे शेतकऱ्यांना उपलब्ध करुन दिले जातील असे सांगून जिल्ह्यातील पाथरी, मानवत, गंगाखेड व सोनपेठ तालुका हा गोदावरीच्या काठावर तर इतर काही गावे नद्याच्या काठावर असल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीस शेतकरी व संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.