कृषी विभागाच्या मागेल त्याला शेततळे योजनेतून गेल्या वर्षभरापासून नवीन शेततळ्याची कामे बंदच आहेत.

मात्र अगोदर मंजुरीनंतर कामे करणाऱ्या राज्यातील १३ हजार २७१ शेतकऱ्यांना अनुदानापोटी ८४ कोटी १४ लाख रुपयांची प्रतीक्षा आहे.

मिळालेल्या माहितीनुसार हा निधी राज्य शासनाच्या नियोजन विभागाकडून दोन महिन्यांपूर्वी निधी मंजूर झालेला आहे. मात्र वितरणाबाबत आदेश निघाला नसल्याने निधी गुंतला असल्याचे सांगण्यात आले.

शेतकऱ्यांनी कमी पाण्यात चांगले उत्पन्न घ्यावे यासाठी शासनाच्या कृषी विभागाने सुरू केलेली मागेल त्याला शेततळे योजना दुष्काळी भागासाठी अत्यंत लाभदायक ठरली असल्याचा अनुभव आहे.

एका शेतकऱ्याला शासन जास्तीत जास्त पन्नास हजार रुपये अनुदान देते. कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे मागेल त्याला शेततळे ही योजना शासनाने स्थगित केली आहे.

मात्र त्याआधी मंजुरी देऊन कार्यारंभ आदेश दिले नंतर ती शेततळी शेतकरी शेतकऱ्यांनी पूर्ण केली. मात्र त्याचे अनुदान अजूनही मिळालेले नाही.

२०१६-१७ ते २०१९-२० या चार वर्षांत राज्यामध्ये अनुदानापोटी ६३६ कोटी २७ लाख रुपये खर्च झाले आहेत.

कृषी विभागाच्या जिल्हास्तरावरून आलेल्या अहवालानुसार १३ हजार २७१ शेतकऱ्यांना अनुदान व कंत्राटी कामगार मानधानापोटी ८४ कोटी १४ लाख रुपयांची २ जून २०२० रोजी कृषी आयुक्तालयातील अमृता संधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन विभागाच्या संचालकांनी रोजगार हमी व जलसंधारण विभागाच्या सचिवांना पत्र देऊन मागणी केली होती.

त्यानुसार १९ जानेवारी २०१९ ला निधी मंजूर झाल्याची माहिती आहे. मात्र आता त्याला दोन महिने उलटून गेले तरी निधी वितरणाबाबत अध्यादेश नसल्यामुळे हा निधी पडून आहे.

शेततळ्यांचे काम पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा असलेल्यांत कोकण विभागात २३२, नाशिक विभागात ४६७, पुणे विभागात ५९३९, कोल्हापूर विभागात १२४३, औरंगाबाद विभागात २३९०, लातूर विभागात ८२३, अमरावती विभागात ३५५ व नागपूर विभागात १८२२ शेतकऱ्यांचा समावेश आहे. नगर जिल्ह्यात २९९५ शेतकरी आहेत. शेततळ्यांचे अनुदान तातडीने शेतकऱ्यांना द्यावे मागणी केली जात आहे.

शेततळ्यांची स्थिती 

  • उद्दिष्ट : १ लाख ९२ हजार ३११ 
  • पूर्ण काम केलेले शेतकरी : १ लाख ४७ हजार ४१३ 
  • अनुदान दिलेले शेतकरी : १ लाख ३४ हजार १४२ 
  • अनुदान प्रलंबित शेतकरी : १३ हजार २७१ 
  • आवश्यक अनुदान : ६६ कोटी ३५ लाख. 
  • चालू व पूर्ण कामासाठी आवश्यक : १६ कोटी 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here