महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची अवस्था चिंताजनक : मालाला भाव, हातात पैसा नाही, बि-बियाणे व्यापाऱ्यांचा व्यवसायही ठप्प

Situation of Farmers in Maharashtra is Alarming | खरीप पिकांच्या पेरणीची तयारी सुरु असली तरी खतांच्या दुकानात शेतकरी गैरहजर आहेत. कृषि केंद्र ओस पडले असून सर्वत्र शुकशुकाट दिसत आहे. सध्या खताचा व्यवहार करणाऱ्या व्यावसायिकांचा व्यवसाय एकदम ठप्प झाला आहे. तर दुसरीकडे थोड्या थोड्या कालावधीत झालेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची पिके जमीनदोस्त झाली. त्यामुळे शेतकरी बि-बियाणाची खरेदी करताना घाई गडबडीत दिसत नाही. सध्या तो दुकानातून खते, बियाणे, औषधे कमी घेत आहेत.

मालाला भाव नाही, शेतकरी आर्थिक संकटात 

आजपर्यंत अनेक शेतकरी आहेत ज्यांनी आपल्या सोयाबीन पिकाची विक्री केली नाही. बाजारात सोयाबीनचे भाव खूपच कमी आहेत, एक दोनदा भाव वाढले पण शेतकऱ्यांनी भाव वाढेल या आशेवर सोयाबीन जपून ठेवले पण भाव काही मिळाला नाही. अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. त्यांच्याकडे पेरणी व बि-बियाणे खरेदी साठी पैसे नाहीत. ज्यांच्याकडे खरिपाच्या पेरणीसाठी पैसे आहेत, त्यांनी हवामान तज्ञाच्या इशाऱ्यामुळे बि-बियाणे टाळण्याची सावध भूमिका घेतली आहे. यामुळे तो खतांच्या दुकानात खते व औषधे घेण्यासाठी येत नाही.

खते, औषधी, बियाणेही महागले

गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील शेतकऱ्यांची स्थिती चिंताजनक आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला हवा तसा भाव मिळत नाही. टोमॅटो आणि कांद्याचे दर कमालीचे घसरले आहेत. सध्या अनेक शेतकरी शेती करणे टाळत आहेत. कारण लागवड आणि उत्पन्न यात मोठी तफावत येत आहे. याशिवाय शेतीमध्ये वापरण्यात येणारी खते, औषधे, बियाणे याच्या सोबत मजुरीचे दर देखील कमालीचे वाढले आहेत. त्यामुळे काही शेतकरी शेतीकडे पाठ फिरवत आहेत.

शेतकऱ्यांसह खत दुकानदारांचेही नुकसान

शेतकरी शेतीत वापरण्यात येणारी कोणत्याही प्रकारचे औषधे घेण्यासाठी येत नाहीत. कारण हातात पैसा नाही, मालाला भाव नाही, बँक कर्ज देत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांसोबतच व्यापाऱ्यांचे देखील नुकसान होत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा शेतकरी उदासीन दिसत आहे, त्यामुळे व्यवसायात मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागत आहे.

Leave a Comment