Sowing of Kabuli Gram : काबुली हरभरा तेजीत; पेरणी वाढली

लातूर : देशात मागील वर्षभर हरभरा दर दबावात होते. मात्र काबुली हरभरा दर (Kabuli Chana Rate) तेजीत आहेत. सध्या काबुली हरभऱ्याला (Kabuli Chana) 13 हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत दर मिळत आहे. त्यामुळे काबुली हरभऱ्याची पेरणीही (Kabuli Chana Sowing) वाढत आहे.

मागील रब्बी हंगामातील हरभरा पीक शेतकऱ्यांसाठी तोट्याचे ठरले. देशी हरभरा दर मागील 8 महिन्यांपासून दबावात आहेत. दिवाळीच्या काळात हरभरा आणि बेसनला मागणी वाढूनही नाफेडच्या विक्रीमुळे दर दबावात होते. मात्र दुसरीकडे काबुली हरभऱ्याचे दर मात्र तेजीत आहेत.

काबुली हरभऱ्याने मागील काही महिन्यांमध्ये ७ हजार रुपये प्रतिक्विंटलपासून आता 13 हजार रुपयांपर्यंत मजल मारली. आंतरराष्ट्रीय बाजारातही याच दरम्यान दर आहेत. त्यातच निर्यातीसाठी चांगली मागणी आहे. देशातही लग्नसराईत काबुली हरभऱ्याला चांगाल उठाव असतो. त्यामुळे पुढील काळातही काबुली हरभऱ्याचे दर तेजीत राहण्याचा अंदाज आहे.

सध्या आंतरराष्ट्रीय बाजारातही काबुली हरभऱ्याचे दर तेजीत आहेत. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात काबुली हरभऱ्याला 1 हजार 550 ते 1 हजार 600 डाॅलर प्रतिटनाचा दर मिळत आहे. म्हणजेच 12 हजार 500 रुपये ते 13 हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत आहे. त्यामुळे भारतातून निर्यातही अधिक झाली. परिणामी दरातील तेजी वाढली.

दरवाढीची अपेक्षा

देशात सध्या केवळ 20 ते 25 हजार टन काबुली हरभऱ्याचा साठा असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. नवा काबुली हरभरा जानेवारीनंतर बाजारात येईल. तोपर्यंत देशात काबुली हरभऱ्याचा तुटवडा जाणवण्याचा अंदाज आहे. त्यामुळे दरही सुधारतील असा अंदाज काही बाजार अभ्यासक व्यक्त करत आहेत.

पेरणी वाढली

काबुली हरभऱ्याला चांगला दर मिळाल्याने शेतकरीही लागवड वाढवत आहेत. मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि इतर राज्यांमध्ये काबुली हरभरा लागवड जोमात सुरु आहे. आत्तापर्यंत काबुली हरभऱ्याचे क्षेत्र मागील वर्षीपेक्षा 50 टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात लागवड अधिक वाढल्याचं जाणकार सांगत आहेत.

Leave a Comment